Type Here to Get Search Results !

Click

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा
     
           
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसा कोण चालवित आहे ? याची चर्चा आजवर बऱ्याचवेळा झाली आहे. याबाबत कुणी जातीचा वारसा सांगितला तर कुणी रक्ताचा सांगितला. कुणी घराण्याचा सांगितला. यापेक्षा वारसा विचारांचा असणे अधिक गरजेचे आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा आजघडीला कोण चालवित आहे ? याबाबत रोखठोक चर्चा होणे गरजेचे आहे. 

          डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाच अपत्य होती. त्यापैकी फक्त एक जगले. यशवंतराव हे त्यांचे नाव. लोक त्यांना सन्मानाने भैय्यासाहेब असेही म्हणतात. त्याही पुढे जाऊन "सूर्यपुत्र" अशी उपमा लोकांनी दिली. सुरुवातीच्या काळात त्यांनी एका महामानवाचे सुपुत्र म्हणून कांही प्रदेश पालथे घातले. लोकांनी त्यांना भरपूर इज्जत दिली. जागोजागी त्यांचे भव्य सत्कार झाले परंतु त्यांचा जास्त काळ प्रभाव पडू शकला नाही. परंतु दलित समाजात एका महामानवांचे सुपुत्र म्हणून, सूर्यपुत्र यशवंतराव उर्फ भय्यासाहेब भीमराव आंबेडकर म्हणून त्यांना कायमचा मान मिळाला आहे व तो भविष्यातही मिळत राहणार पण महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारश्याचे काय ?

             भय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांचे सुपुत्र प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. त्यांनी सुरुवातीचा कांही काळ समाजवादी लोकांसोबत घालविला. विशेष करून ब्राह्मणांच्या घोळक्यात ते वावरले आणि शेवटी ब्राह्मण मुलीसोबतच लग्न केले. असे म्हणतात कि त्यांनी आपल्या मुलाची मुंज केली. दलित समाजाला हा एक फार मोठा झटका होता. नंतर त्यांनी राजकारणात अकोला प्याटर्ण निर्माण केला. त्या परिसरातील सत्ता हातात घेतली. उत्तरेतील कांशीराम - मायावती यांना महाराष्ट्रात रोखण्यासाठी त्यांनी भारिप-बहुजन महासंघ हा प्रयोग केला. तो कांही काळ चांगला चालला परंतु पुढे चालून तो सपशेल फसला. 

             अजूनही प्रकाश आंबेडकर वेगवगळे राजकीय प्रयोग करीत असतात. बाबासाहेबांचे नातू म्हणून विविध राजकीय पक्षांनी त्यांचा वापर करून घेतला. बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचेबद्दल दलित समाजात प्रचंड आस्था आहे, त्यामुळे त्यांचे प्रत्यक्षात नातू म्हणून प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी म्हणून लाखो लोक जमत होते. याचा गैरफायदा घेवून कांही व्यापारी प्रवृत्तीच्या लोकांनी या लोकभावनेचे मार्केटिंग केले. यामुळे त्यांचा राजकीय वापर जास्त झाला. भारिप - बहुजन महासंघ म्हणजे "खरेदी विक्री संघ" असा उपहास ऐकावयास मिळत होता. दलित चळवळ आता संपली, जात संपवून टाका, आता आम्हाला आरक्षण नको, जाती अंताची लढाई असे मुद्दे घेऊन अधून - मधून प्रकाश आंबेडकर चर्चेत येत असतात. 

             उत्तर भारतातही प्रकाश आंबेडकर यांनी झेप घेण्याचा प्रयत्न केला परंतु या भागात त्यांचा फारसा प्रभाव पडू शकला नाही. कांशीराम - मायावती यांची शक्ती क्षीण करता येईल का म्हणून प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्थापितांनी चांगलाच वापर करून घेतला परंतु याबाबतीतही ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. कारण तिथे बहन मायावती एक - दोन वेळा नव्हे तर चार वेळा मुख्यमंत्री झाल्या. त्यांचा हत्ती प्रकाशजी रोखू शकले नाहीत, उलट त्यांचेच हसू झाले. फुले, शाहू आंबेडकरांची कर्मभूमी महाराष्ट्र असूनही ईथे आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारी एकही व्यक्ती सत्ताधारी होऊ शकली नाही किंवा मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकली नाही. राम -कृष्णाच्या जन्मभूमीत, गंगा - यमुनेच्या अत्यंत सनातनी कट्टर धार्मिक प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता प्रस्थापित करण्यात कांशीराम - मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला यश मिळू शकले. ही बाब मान्य केलीच पाहिजे अशी आहे. 

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक किंवा राजकीय वारसा त्यांच्या नातूच्या माध्यमातून पुढे चालला नाही. रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही गटाने हे शक्य झाले नाही. देशभर नाही तर नाही किमान महाराष्ट्रात तरी हे राजकीय परिवर्तन अपेक्षित होते. जगात होत नाही तशी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात भीम जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते परंतु यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय व वैचारिक प्रभाव स्पष्ट होऊ शकला नाही. उत्तर प्रदेश प्रमाणे ईथे राजकीय परिवर्तन का होऊ शकत नाही ? याचा विचार फुटीर बामसेफचे नेते मा. वामन मेश्राम हे तरी करणार आहेत की नाही ? का ते देखील उत्तर प्रदेशात जाऊन बसपाच्या पायात पाय घालण्यातच स्वतःला धन्य समजतील.. . !  

            आपली फार मोठी ताकत निर्माण झाल्याची आवई वामन मेश्राम उठवित आहेत. या ताकतीचा अगोदर फुले शाहू आंबेडकरांच्या जन्म व कर्म भूमीत म्हणजे महाराष्ट्रात ते ठसा उमटवतील काय ? हा प्रश्न महत्वाचा आहे. ते विचारवंत आहेत. त्यांचा विचार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आहे हे त्यांना अगोदर या महाराष्ट्रात सिद्ध करून दाखवावे लागेल ! नुसते परिसंवाद आणि चर्चासत्र घेवून केवळ पैसा गोळा करणे या एक कलमी कार्यक्रमातून मेश्राम यांना बाहेर येवून राजकीय झुंज द्यावी लागणार आहे. केवळ भावनिक भाषणबाजीतून राजकीय कर्तृत्व दिसून येणार नाही. 

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे म्हणून राजरत्न आंबेडकर यांना पुढे आणण्याचा प्रयत्न वामन मेश्राम यांनी करून पाहिला. मेश्राम यांना आम्ही वैचारिक नेते समजत होतोत. त्यांनी चळवळीला वैचारिक पर्याय देण्याऐवजी राजरत्नच्या भावनिक पर्याय देण्याचा प्रयत्न केला, तो सपशेल फसला. म्हणून गद्दारीचा शिक्का मारून राज्रत्नला सोडचिट्टी देण्यात आली. रक्त, जात व घराणे हे तात्पुरते पर्याय आहेत, वैचारिक वारसा हाच महत्वाचा आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी भिमजयंती वर्षात याबाबत गंभीर चर्चा झाली पाहिजे. आज उत्तर भारतात चर्मकार समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक व राजकीय चळवळ आपल्या खांद्यावर घेवून यशस्वी वाटचाल करीत आहेत.  

              रिपब्लिकन नेते खा. रामदास आठवले यांच्या बाबतीत वैचारिक चर्चा न केलेलीच बरी. कारण त्यांच्या उक्ती आणि कृतीत बराच फरक पडत चाललेला आपण पाहत आहोत. उलट ते मायावती यांनाच प्रश्न विचारतात कि त्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा का घेतली नाही ? कांशीराम - मायावती यांनी अविवाहित राहून आपले सर्व जीवन चळवळीसाठी समर्पित केले हे जगजाहिर असतांनाही आठवले यांना मात्र या गोष्टीची आठवण राहत नाही याचे आश्चर्य वाटते. आपली सर्व कारकीर्द संघ आणि भाजपच्या चरणी अर्पण करणाऱ्या रामाच्या दास झालेल्या आठवलेंना कोणता नैतिक अधिकार पोहचतो कि त्यांनी उठसूठ भिमकन्या मायावती यांचेवर तोंडसुख घ्यावे ? ये जो पब्लिक है वह सब जानती है !

              "डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात हिंदु घर्मातला मोठा समुह ब्राम्हण रचित थोतांडा विरुध्द बंड करतोय हा आंबेडकरी चळवळीतला सर्वात मोठा विजय होय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आता बहुजन समाज मोठ्या प्रमाणात जपत आहे, महाराष्ट्रात साजरा होणारा गुढी पाडवा संभाजी राजे भोसले यांच्या खुनाचे प्रतीक आहे म्हणुन साजरा केला जातोय याची चिकीत्सा झाल्यानंतर मराठा समाजाने ही गुढीच न ऊभारण्याचा निर्णय घेतला. नांदेड मधील चर्मकार महिलांनीही यावर्षी गुढी उभारली नाही. यामुळे आता आपली सनातनी परंपरा जपण्यासाठी ब्राह्मण महिलांना हातात गुढ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागले. या मिरवणुकीत ब्राह्मण कमी आणि किरायाने आणलेले ओबीसी अधिक दिसून येत होते.  

            सनातनी लोकांनी जातीभेद करुन अस्पृश्य आणि महिलांना मंदिर प्रवेश नाकारला होता. देवदर्शनाने भाकरीचा प्रश्न सुटणार नाही याची अनुभुती झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या आंदोलनामुळे दलितांनी मंदिर प्रवेशाचा आग्रह सोडून दिला म्हणुन ही प्रथा आपोआप संपुष्टात आली. परंतु महिलांनी समानतेच्या वागणुकीच्या आग्रहाखातर डॉ. आंबेडकर जयंतीच्या काळातच यशस्वी झेप घेत महिलांनी शनिच्या चबुतऱ्यावर जाऊन आपला समतेचा हक्क सिद्ध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  समतावादी संविधानामुळे उच्च न्यायालयाने देखील या मंदिर प्रवेशाच्या बाबतीत फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर दिले. त्यामुळे सरकारने मंदिर समितीला तंबी दिली यामुळे प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. हा भारतीय संविधानाचा विजय आहे.. . !

              शतकोत्तर रौप्यमहोत्सवी भिमजयंती वर्षात बहुजनांना बाबासाहेबांच्या आत्मसन्मानाच्या लढयाचे महत्व आता कळायला लागले असे म्हणावे लागेल. बहुजन बांधव धर्मशास्त्राची चिकित्सा करायला लागले आहेत. आता बौध्दाना सुध्दा समजुन ऊमजुन बौध्द व भीम अनुयायी म्हणुन जबाबदारीने आपली पाऊले टाकावी लागतील. केवळ भावनिक होऊन "लई मजबूत माझ्या भीमाचा किल्ला…" असे भावनिक बोलून चालणार नाही. केवळ राशनकर्ते नाही तर शासनकर्ते होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समर्थ वैचारिक वारसा पुढे चालविण्याची शपथ बौद्ध व सर्व आंबेडकरवादी बहुजन समाजाने या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी भिमजयंती वर्षात घेतली पाहिजे !  

 -- चंद्रप्रकाश देगलूरकर,
 संस्थापक, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद,
भगीरथ नगर, जंगमवाडी रोड, नांदेड - 431 605

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.